सातारा : कामानिमित्त पाचगणीला गेलेल्या वाई तालुक्यातील एका विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये परीक्षेला जायचं होतं. मात्र, पसरणी घाटात ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळं अर्ध्या तासात तो पेपरला पोहचू शकणार नव्हता. अशावेळी विद्यार्थ्याला पॅराग्लायडींगद्वारे थेट परीक्षा केंद्रावर उतरवण्यात आलं. त्यामुळं परिक्षेच्या पाच मिनिटं आधी पोहोचून त्याला वेळेत पेपर देता आला. समर्थ महांगडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? : वाई तालुक्यातील पसरणी गावचा समर्थ महांगडे वाईतील किसन वीर महाविद्यालयात शिकत आहे. त्याचा १५ फेब्रुवारीला पेपर होता. मात्र, त्या दिवशी तो कामानिमित्त पाचगणीला गेला. त्याठिकाणी भेटलेल्या त्याच्या ओळखीच्या विद्यार्थिनींनी त्याला परीक्षेची आठवण करुन दिली. पेपरला अवघा अर्धा तास शिल्लक होता. त्यात वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाट वाहतूक कोंडीनं जाम होता. त्यामुळं अर्ध्या तासात परीक्षा केंद्रावर पोहोचणं शक्य नव्हतं.
पॅराग्लायडिंग करत पोहचला परीक्षा केंद्रावर : समर्थ महांगडेच्या संदर्भातील चर्चा ऐकून पाचगणी येथील गोविंद येवले यांनी त्याला पॅराग्लायडिंगद्वारे परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याची तयारी दाखवली. सुरुवातीला तो घाबरला. मात्र, गरज ओळखून त्यानं मनाची तयारी केली. गोविंद येवले यांनी प्रशिक्षित पॅराग्लायडर्ससोबत समर्थला कॉलेजच्या परिसरातील मैदानावर उतरवलं. मित्र कपडे, बॅग घेऊन आला आणि समर्थ पाच मिनिटं आधी परीक्षेला पोहोचला. "गोविंद येवले यांच्यामुळं मी परीक्षेला वेळेत पोहचू शकलो," असं म्हणत समर्थनं त्यांचे आभार मानले.
पॅराग्लायडिंग करत परीक्षेला जातानाचा व्हिडिओ व्हायरल : समर्थ महांगडे हा पॅराग्लायडिंग करत परीक्षेला जात असलेला व्हिडिओ सोशल माध्यमांवर पोस्ट करण्यात आला आहे. समर्थ हा प्रशिक्षित पॅराग्लायडर्ससोबत आकाशात भरारी घेत असलेलं त्या व्हिडिओत दिसत आहे. तसंच एका विद्यार्थ्यानं नाट्यमयरित्या परीक्षा केंद्र गाठून वेळेत पेपर दिल्यानं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा :