जळगाव : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर कुख्यात अवैध शस्त्र माफियांनी थेट हल्ला करत पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण केल्यानं खळबळ उडाली. ही घटना मध्य प्रदेशच्या सीमेवरील उमर्टी गावात घडली. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या गावात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले. मात्र यावेळी गुन्हेगारांनी पोलिसांना घेरुन चक्क हवेत गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रत्युत्तर म्हणून हवेत गोळीबार केला. मात्र शस्त्र माफियांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. माफियांनी पोलीस जवान शशिकांत पारधी यांना मध्यप्रदेशात तब्बल चार तास ओलीस ठेवलं.
मुख्य आरोपीला अटक : "आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची आम्ही गांभीर्यानं दखल घेतली आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीनं आमच्या सहकाऱ्याची सुटका केली आहे. दोषी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल", अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका : अवैध शस्त्र माफियांकडून पोलिसांना ओलीस ठेवण्याचा हा प्रकार तसा धक्कादायक असला, तरी महाराष्ट्र पोलिसांनी देखील प्रत्युत्तर म्हणून हवेत गोळीबार केला. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीनं अखेर अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका करण्यात यश मिळालं. मात्र, या घटनेनंतर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सीमेवरील उमर्टी गावातील अवैध शस्त्र विकणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करणार कारवाई ? : "आम्ही उमर्टी गावात कारवाईसाठी गेले होतो. एका आरोपीला पकडलं. त्यानंतर तिथल्या लोकांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या आदल्या रात्री घडल्यानं, आता मुख्यमंत्री यावर काय पावलं उचलतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. "चार तासांच्या थरारक नाट्यानंतर महाराष्ट्र पोलिसाला मध्यप्रदेशातून सुखरुप सोडवण्यात आलं. तरी हा प्रकार पोलिसांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं गंभीर इशारा देणारा आहे," अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. तर आता अवैध शस्त्र माफियांवर कठोर कारवाई होते का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -