कोल्हापूर : "सुरेश धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोणत्याही मुद्यावर माघार घेतलेली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण जोपर्यंत निकाली लागत नाही, तोपर्यंत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी आपआपली बाजू कायम ठेवलेली आहे. सुरेश धस यांनी जो मुद्दा हाती घेतलेला आहे, तो तडीस लावल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत. तसंच महाराष्ट्राच्या इतिहासात पश्चिम महाराष्ट्रानं सर्वात मोठा विजय महायुतीला दिला आहे," असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
लवकरच त्यांचा प्रवेश करुन घेऊ : "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आतापासूनच कामाला लागली आहे. आज कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची संघटन पर्व कार्यशाळा पार पडली. या मेळाव्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील भाजपाचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करुन घेण्यावर भर देण्यात येत आहे," अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकसभेचा वचपा विधानसभेत काढला : या मेळाव्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "पश्चिम महाराष्ट्र आधी शेकाप, काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, आता भाजपानं या बालेकिल्ल्यांची धूळधाण उडवलेली आहे. लोकसभेला काहीशी पीछेहाट झाली. मात्र, त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत आपण काढला."
आपल्या ताकदीची जाणीव करण्यासाठी कार्यशाळा : "कधी कधी आपली ताकद आपल्यालाच माहिती नसते. ताकदीची जाणीव करून देण्यासाठीच ही कार्यशाळा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्याकडून कोण लढू शकते? याचा विचार करुन त्यांना ताकद द्या. सध्या पक्षांतरासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. नुकतच धनंजय महाडिक यांनी बावनकुळे यांच्याकडं जिल्ह्यातील काही जणांची यादी दिली आहे. लवकरच त्यांचा प्रवेश करुन घेऊ तसं झालं तर, जिल्ह्यात विरोधकच बाकी राहणार नाही. काही जण आता काळ्या जादूबद्दल बोलत आहेत. मात्र, आपले आता 227 आमदार आहेत. काळी जादू करुन सुद्धा काही फरक पडणार नाही" असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांना बदनाम करण्यात काहीही अर्थ नाही : चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या पक्षप्रवेशाच्या विधानाला चंद्रशेखर बावनकुळेंनी दुजोरा दिला. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संकल्पना आणि विकासाला साथ देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोक भाजपामध्ये येणार आहेत. लवकरच याची यादी कळेल. विकसित महाराष्ट्रासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपामध्ये येतील." असं ते म्हणाले. दरम्यान, शनिवारी एका हॉटेल उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर होते. यानंतर जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली. या संदर्भात देखील बावनकुळे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, "जयंत पाटील यांना बदनाम करण्यात काहीही अर्थ नाही. ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. आत्तापर्यंत तरी जयंत पाटील यांनी केंद्रीय नेतृत्व किंवा राज्यातील नेतृत्वासोबत संपर्क केलेला नाही. त्यामुळं जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात काहीही बोलू नये."
हेही वाचा :