ठाणे - एका टेम्पोमधून लाखोंच्या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची खबर कुळगाव - बदलापूर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वांगणी परिसरात नाकाबंदी सुरु असतानाच गुटखा वाहतूक करणारा टेम्पो थांबवून झडती घेतली. यात पोलिसांना सव्वा सात लाखांचा गुटखा आढळला.
याप्रकरणी कुळगाव - बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मिटू गुप्ता असे अटक केलेल्या चालकाचे नाव असून त्याचा टेम्पोही मालासह जप्त करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अवैध्यरित्या मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे अनेकदा पोलिसांच्या छापेमारीत आढळून आले. त्यातच मुंबई, गुजरात,सुरत अशा विविध शहरातून येणारा गुटखा विविध शहरातील छोट्या गोदामात व दुकानात साठवून ठेवला जातो. त्यानंतर तो जिल्ह्यातील विविध भागामध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.
असाच एक गुटख्याने भरलेला टेम्पो शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला मौजे वांगणी येथे ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदीत आढळून आला. हा टेम्पो नेरळ आणि कर्जत या ठिकाणी गुटखा विक्रीस जात होता. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक, संजयकुमार पाटील, डॉ.बसवराज शिवपूजे, उप विभागीय पोलीस अधिकारी मुरबाड व वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव - बदलापूर ग्रामीण पोलिसांनी केली आहे.