ठाणे : कोरोनामुळे सर्वच सण आणि उत्सवावर निर्बंध आले आहेत. अशात आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. एकीकडे निर्बंध आणि दुसरीकडे आजाराची भीती यामुळे या गणेशमूर्ती कलाकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गर्दी टाळण्यासाठी आता कलाकारांना गणेश मूर्ती लवकर कार्यशाळेतून घरी घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना करावे लागत आहे.
कोरोना संसर्गामुळे गणपती उत्सवावर देखील सरकारने निर्बंध आणले आहेत. यावर्षी छोट्या मुर्तींसह गर्दी न करता, मिरवणूक देखील न काढता गणपती उत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. याचप्रमाणे गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यात देखील गणपतीच्या मूर्ती काही दिवस आधीच घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून चतुर्थीला किंवा त्याच्या आदल्या दिवशी कारखान्यात गर्दी होणार नाही. मात्र, या आवाहनाला अतिशय कमी नागरिक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे दरवर्षी ज्या प्रमाणात गणपती मूर्ती बुक केल्या जातात, तितक्या प्रमाणात या वर्षी झाल्या नाही. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्यदेखील लॉकडाऊनमुळे उपलब्ध नसल्याने मुर्तींचे काम देखील अर्धवट आहे. अशा अनेक समस्यांना मूर्तिकारांना तोंड द्यावे लागत आहे. आता या कलाकारांनी नागरिकांना गणेश मूर्ती गर्दी टाळून लवकर घेऊन जाव्यात, असे आवाहन केले आहे. पण त्यालाही नागरिक फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीत.
दरवर्षीपेक्षा यंदा गणेशमूर्तींची मागणी कमी
दरवर्षी हजारो मूर्तींची मागणी नागरिकांकडून होत असते. तसे बुकिंगही नागरिक करत असतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे गणेशमूर्ती आणि त्यात बदलही मूर्तिकार करत असतात. मात्र, यावर्षी गणेश मूर्ती अगदी थोड्या प्रमाणात बुक झाल्या आहेत आणि मूर्तींची मागणीही कमी प्रमाणात आहे, असे कारागीर सांगत आहेत. अनेक कुटुंबांनी कोरोनाच्या भीतीपोटी गणेश मूर्ती स्थापन न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मूर्तिकार सांगतात.