ठाणे - लॉकडाऊनमुळे गुजरातमधून येणारी शाडूची माती वेळेत उपलब्ध झाली नसल्याने कारखानदारांना ही माती चढ्या भावाने विकत घ्यावी लागली आहे. त्यामुळे यंदा विग्नहर्त्या बाप्पाची किंमत थेट 30 ते 50 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती कारखानदारांनी दिली. तर कोरोनाचा यंदा बाप्पाच्या गणेशोत्सवावर परिणाम होणार असे स्पष्ट दिसत आहे.
दरवर्षी घरच्या आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचे आगमन हे गणेश चतुर्थी किंवा त्याच्या आदल्या दिवशी होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाने दिलेल्या नियमांनुसार फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करूनच कल्याण-डोंबिवलीमध्ये 8 ते 10 आधीच बाप्पांचे आगमन भक्तांच्या घरी होणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात एकूण 45 हजार 51 गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. यात 289 सार्वजनिक, तर 45 हजार 51 घरगुती गणपतींचा समावेश राहणार आहे. तथापी कोरोनाच्या महामारीमुळे यंदा घरगुतीसह सार्वजनिक गणेश उत्सवावर बहुदा विरजण पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सवासाठी लागणारे मखर, मंडप सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करणारी प्रदर्शने भरवण्यावर कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. मात्र, बहुसंख्य भाविक पर्यावरण स्नेही मखर, मखरासाठी लागणारी आरास, तसेच शोभेच्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देणार असल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शोभिवंत मखरांपैकी कागदाचा लगदा, पुठ्ठे, कागद आणि कापडांपासून तयार केलेली वेलबुट्टीची फुले भक्तांना लागणार आहेत. यात शाडूच्या मूर्तींनाही मोठी मागणी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवलीकरांचा शाडूच्या गणेश मूर्तींसाठी आग्रह आहे.
गोडसे कुटुंबाकडून कल्याण-डोंबिवलीत गेल्या 120 वर्षांपासून शाडू मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती केली जाते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशाच्या आगमनासाठी कल्याण-डोंबिवलीकर सज्ज झाले आहेत. पण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन शाडूच्या मूर्तीची मागणी गणेश भक्तांमध्ये वाढली असल्याचे डोंबिवलीतील गोडसे कला केंद्राचे ज्येष्ठ मूर्तीकार दिलीप गोडसे यांनी सांगितले. गोडसे यांची चौथी पिढी आजही सुबक मुर्त्या बनवत आहे. शाडूच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होत नाही आणि विसर्जानंतर मातीही पाण्यात लवकर विरघळते. त्यामुळेच या मूर्तीला मोठी मागणी आहे.
गणेश चतुर्थी किंवा त्याच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी भाविकमंडळी गणेश कारखाना किंवा विक्रेते यांच्याकडे रांगा लावतात. मात्र, ती रांग आता लावता येणार नाही. कोरोना आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. कल्याण आणि डोंबिवलीच्या शहर व ग्रामीण भागातील कारखानदार आणि विक्रेते फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून यंदा 8 ते 10 दिवस आधीच गणेश मूर्ती घरी आणि मंडपाच्या ठिकाणी आणणार आहेत. तर, दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे गुजरातमधून येणारी शाडूची माती वेळेत उपलब्ध झाली नसल्याने कारखानदारांना ही माती चढ्या भावाने विकत घ्यावी लागली आहे. त्यामुळे यंदा विग्नहर्त्या बाप्पाची किंमत थेट 30 ते 50 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती कारखानदारांनी दिली.