नवी मुंबई - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणाऱ्या 'फाईव स्टार रेटिंग'ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबई शहराला पुन्हा फाईव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील सहा शहरांना हे रेटिंग जाहीर झाले असून नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तीन वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकाकडून स्टार रेटिंगच्या निकषांचे बारकाईने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. तसेच या पथकाकडून नवी मुंबईतील विविध ठिकाणी अचानक भेटी देऊन स्वच्छतेची व कचरा वर्गीकरणाची पाहाणी करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे कचऱ्याचे संकलन व वाहतूक पद्धतीसह त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेचे निरीक्षण करण्यात आले. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्षरीत्या नागरिकांचे अभिप्राय नोंदवण्यात आले. या पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यात आले आहे. त्यात पुन्हा नवी मुंबईला हा मान मिळालाय.
नवी मुंबईसह मध्य प्रदेशमधील इंदौर, कर्नाटकातील म्हैसूर, गुजरात मधील सुरत व राजकोट, छत्तीसगडमधील अंबिकापूर या शहरांना मानांकन आहे. मागील वर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेने कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटिंग मिळवले होते. यापुढील काळात 5 स्टार रेटिंगच्या पुढे जाऊन सेव्हन स्टार रेटिंग प्राप्त करण्यासाठी पुढील वाटचाल असेल असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.