ठाणे - सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणारी कोविशिल्ड लस कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात १३ जानेवारी रोजी दाखल झाली. विशेष म्हणजे १३ मार्च २०२० रोजी कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर खऱ्या अर्थानं शनिवारी कोरोना लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रथम लसीचा पहिला डोस घेतला.
म्हणून पहिला डोस मीच घेतला..
जनमानसाच्या मनातील कोरोनाची भीती निघून जावी म्हणून पहिला डोस मीच घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कोरोनाची लस घेतल्यानंतर मला काहीही त्रास होत नसल्याची प्रतिक्रिया डॉ. अश्विनी पाटील यावेळी दिली. महापालिकेने लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी केली असून न घाबरता ही लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लस
१३ मार्च २०२० मार्चपासून सुरु असलेला कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी दिलेल्या सहकार्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर डॉ. अश्विनी पाटील, कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी देखील यावेळी लस घेतली. तर डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉ. संतोष केंभवी यांनी लसीच्या पहिला डोस घेतला. कल्याण पूर्व येथील शक्तिधाम विलगीकरण केंद्रामध्ये महापालिकेच्या डॉ. संदीप निंबाळकर यांनी देखील लसीच्या पहिला डोस घेतला. तर कल्याण डोंबिवलीत तीन ठिकाणी कल्याण डोंबिवली आरोग्य विभागाने आज दिवसभरात १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.
आजही कोरोनाचे रुग्ण शंभरच्या आसपास
दिवाळीपूर्वी मोठा प्रमाणात कोरोनाचा उद्रेक कल्याण डोंबिवली क्षेत्रात पाहवयास मिळाला होता. त्यावेळी दरदिवशी रुग्णांची संख्या ५०० ते ६०० च्या घरात घरात होती. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळून येणारी कल्याण डोंबिवली महापालिका जिल्ह्यात प्रथम ठरली होती. मात्र, गेल्या दीड महिन्यात झपाट्याने रुग्णांची संख्या कमी होऊन शंभरच्या आसपास कमी जास्त होत असल्याने काहीसा प्रादुभाव कमी झाला आहे. शुक्रवारीही ८४ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णांनी ५६ हजार ७४२ संख्येचा ठप्पा गाठला आहे. तर १ हजारच्यावर रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजही महापालिका हद्दीतील विविध कोविड रुग्णालयात १ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.