नवी मुंबई - घणसोली गावातील आदिशक्ती नगर येथील अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यांवरील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तळमजल्यावर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
दोन दिवसांपुर्वी मुंबईत झोपड्यांना आग -
दोन दिवसांपुर्वी मुंबईतील कुर्ला पश्चिम साकिनाका येथील खाडी नंबर 3 वरील झोपड्यांना सकाळी आग लागली. ही आग लेव्हल 2 ची असली तरी तिला विझवायला तब्बल साडेतीन तासांचा अवधी लागल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
सेंट्रल मॉलला आग -
मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवताना धुरामुळे एक जवान जखमी झाला होता. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे तब्बल 250 अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत होते. यावेळी या मॉलच्या बाजूला असलेली 55 मजली ऑर्किड एन्क्लेव ही इमारत खाली करण्यात आली होती.
दादर बाजार आग -
दादर परिसरातील बाजारपेठेत काही दिवसांपुर्वी भीषण आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. अग्निशमन विभागाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली होती. या आगीत बाजारातील काही दुकाने जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले होते.
पवईत हॉटेलला भीषण आग -
पवई आयआयटी मार्केट जंक्शन समोर असणाऱ्या एका हॉटेलला भीषण आग लागली होती. यामध्ये हॉटेल पूर्णपणे जळून भस्मसात झाले होते. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.
चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील दुकानाला आग -
गेल्या महिन्यात हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या मार्केटमधील एका दुकानाला पहाटे आग लागली होती. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली होती.
हेही वाचा - कल्याण पश्चिम येथील रेल्वे वसाहतीमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग