नवी मुंबई - तळोजा कारागृहात एपीआय असल्याची बतावणी करून, ठाणे कारागृहाचे टेंडर मिळवून देतो असे आमिष दाखवून, तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पती-पत्नीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्रीय डायरेक्टर जनरल ऑफिस येथून सेक्शन ऑफिसर या पदावरून सेवानिवृत्त झालेले भास्कर चिचुलकर हे कामोठे वसाहतीत राहत असून, त्यांची ओळख प्रवीण कांबळे या गृहस्थाशी पुरुषोत्तम उपताळे याने करून दिली. तेव्हा प्रवीण कांबळे याने तो तळोजा कारागृहात एपीआय या पदावर कार्यरत असल्याची बतवणी केली. तसेच त्याच्या डीआय या कंपनीमार्फत कारागृहात जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातात, असेही त्यांनी सांगितले. तसेच माणिक कारागृहातही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी टेंडर निघणार असल्याची माहितीही कांबळे याने दिली. तसेच तुम्हाला ते टेंडर मिळवून देतो, अशीही थाप मारली व त्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून 23 लाख 45 हजारांची रक्कमही चिचुलकर यांनी कांबळे याच्या डीआय कंपनीच्या नावे दिली. यानंतर ठाणे येथील शिवाजी चौक येथे गाळा भाड्याने घेऊन, चिचुलकर यांनी व्यवसायाला सुरुवात केली.
हेही वाचा - पाकने हाफिज सईद आणि सलाहुद्दीनला सांगितले, काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पाठवा?
नोव्हेंबर 2018 मध्ये कांबळे याच्या डीआय कंपनीने पाण्याच्या बाटल्या घेणे बंद केल्याने यासंदर्भात चिचुलकर यांनी कांबळेला विचारले असता, ठाणे कारागृहाचे टेंडर डिसेंबर 2018 ला निघणार असल्याचे सांगितले. त्यानंतर चिचुलकर यांनी तळोजा कारागृहात चौकशी केली असता, तिथे प्रवीण कांबळे नावाची व्यक्ती कार्यरत नसल्याने समजले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी प्रवीण कांबळे व त्याची पत्नी सुनीता कांबळे यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.