ठाणे - डोंबिवलीतील एका गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर वितरणाचे काम करणाऱ्या कामगाराला काँग्रेसच्या माजी आमदाराने धमकी देत, साथीदारांकडून बेदम मारहाण केल्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतण्यात आला आहे. संजय दत्त असे गुन्हा दाखल झालेल्या काँग्रेसच्या माजी आमदाराचे नाव आहे. त्यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर दिपक निकाळजे (वय २७) असे तक्रारदार कामगाराचे नाव आहे.
- लोखंडी रॉडने मारहाण
जखमी दीपक निकाळजे हा कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरात राहतो. तर माजी आमदार संजय दत्त कल्याण पश्चिम परिसरात रहात असून त्यांची गेल्या २० वर्षांपसून गॅस एजन्सी कल्याण डोंबिवली भागात आहे. त्यातच रविवारी त्याला माजी आमदार संजय दत्त यांनी फोनकरून धमकी दिली. शिवाय आमदार दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी रविवारी सकाळच्या सुमारास रस्त्यात गाठून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचे निकाळजे याने तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्येही आमदार दत्त यांच्याविरोधात डोंबिवलीतील आणखी एका गॅस सिलेंडर वितरकाने कोंडून ठेवत मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. या दोन्ही घटना पाहता माजी आमदाराच्या दबंगगिरीची चर्चा कल्याण डोंबिवलीत रंगली आहे.
- 'माझ्यावर खोटा गुन्हा'
आमदार संजय दत्त यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. दीपक निकाळजेकडून जादा पैसे उकळले जात असल्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. यात आमच्या गॅस एजन्सीची बदनामी होत होती. त्यामुळे यापूर्वीच त्याला कामावरून काढून टाकले आहे. मात्र तो आता आमच्या अन्य कामगारांना काम करू नका, असे दम देऊ लागला. त्याबाबत त्याला समजावले असता त्याने खोटी तक्रार दिल्याचे माजी आमदार दत्त यांनी सांगत निकाळजे याचे आरोप फेटाळले आहेत.
हेही वाचा - भीक मागण्यासाठी तीन वर्षीय बाळाचे अपहरण; 24 तासात महिलेस अटक