ठाणे - बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजत असताना महाविद्यालयीन तरुणाई देखील गणेशोत्सवातून सामाजिक हित जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ठाण्यात बाप्पाच्या सजावटीसाठी वक्रतुंड आर्ट्सच्या माध्यमातून सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स महाविद्यालयाचे विद्यार्थी पर्यावरणपूरक मखर तयार करत आहेत.
लाकूड, प्लायवूड कागद, पुठ्ठा, वेत अशा इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करून हे मखर तयार करण्यात आले आहे. या मखरांचा पुनर्वापर करण्यासाठी आकर्षक ऑफरही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पब्जी, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला पॉकेटमनी जमा करण्याची नामी संधी उत्सवकाळात मिळत आहे.
राज्य सरकारने प्लास्टिक, थर्मोकॉलवर बंदी आणली आहे. तरी देखील बाजारात अनेक ठिकाणी अशा मखर विक्रीचा सुळसुळाट दिसून येतो. या मखरांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. ही बाब लक्षात घेऊन ठाण्याच्या लक्ष्मी पार्क येथील वक्रतुंड आर्ट्सने सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने आखीव-रेखीव, सुबक पर्यावरणपूरक मखर तयार केले आहेत.
हेही वाचा - ठाणे विधानसभा आढावा : ठाणे शहराचा बालेकिल्ला कोण सर करणार? भाजप सेनेत चढाओढ
फोल्डिंगच्या या मखरांना गणेश भक्तांकडून चांगलीच मागणी आहे. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थी असलेल्या विघ्नेश जांगळे व संकेत सुतार यांची टीमच मखरांच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस झटत आहेत. विशेष म्हणजे, गणेश भक्तांनी पुढील वर्षी हे मखर सुस्थितीत आणून दिल्यास त्यांना १५ टक्के घसघशीत सूट नवीन मखरांवर वक्रतुंड आर्ट्सच्या माध्यातून देण्यात आली आहे.
हेही वाचा - कल्याण पश्चिम विधानसभा जागेसाठी शिवसेनेची खेळी की सेनेला धक्का?
सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून वक्रतुंड आर्ट्सने त्यांच्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटवरही मखर डिझाईन अपलोड करून त्यावरूनही ऑर्डर बुकिंग सुरू केली आहे. तर दुसरीकडे ९९६९९५५४२२, ९७६८०२९९९० या व्हॉट्सअॅप क्रमांकांवरूनही मखरांचे डिझाईन गणेश भक्तांना फॉरवर्ड केले जात आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात मखर घरी बनवणे सर्वच गणेश भक्तांना सहजासहजी शक्य होत नाही. त्यामुळे हा टेक्नोसॅव्ही आणि इकोफ्रेंडली पर्याय निश्चितच गणेश भक्तांना उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा - ठाण्यात रेल्वेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर; दररोज ३०० वेळा बंद पडतात सरकते जिने