ठाणे - उल्हासनगर शहरात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात घडत असतात. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
उल्हासनगरमधील वार्ड क्रमांक 5 मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र असे असतांनाही या वार्डाचे नगरसेवक प्रशांत पाटील हे गेल्या एक वर्षांपासून वार्डमध्ये फीरकले देखील नसल्याचा आरोप नागिरकांनी केला आहे.
नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून खड्ड्ये बुजवण्याचे काम
वार्ड क्रमांक 5 मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील हे खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी नगरसेवक प्रशांत पाटील यांच्याकडे केली होती. मात्र मागणी मान्य होत नसल्याने, अखेर नागरिकांनीच पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र याची माहिती होताच महापालिका प्रशासनाकडून नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हे खड्डे बुजवण्यात आले. नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.