ठाणे: महापालिका क्षेत्रात अनेक जलतरण तलाव असेल तरी ते आता अपुरे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे ठाण्यातील वाढती लोकसंख्या होय. त्यामुळे ठाणेकरांनी आणखी काही जलतरण तलावांची गरज भासत आहे. तर याच जलतरण तलावामध्ये अगदी सहा वर्षांपासून 86 वर्षांपर्यंतचे नागरिक पोहण्याचा आनंद घेत असतात. पोहणे हा सर्वांसाठी मोठा फायदेशीर आणि लाभदायक उपाय असल्याचं नेहमीच डॉक्टर सांगतात. अनेकांना पोहण्याचा छंद असतो; मात्र उन्हाळ्यात मात्र जलतरण तलावात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते.
उन्हाळी सुट्टी मुलांसाठी उपयुक्त: उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची पोहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. मुलांचे पालक त्यांच्या पाल्यांना पोहोण्याचे क्लासेस लावून देतात. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांमध्ये महापालिकेच्या सर्वच तलावांमध्ये लहानांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी देखील प्रशासनाकडून घेतली जाते.
खासगीपेक्षा महापालिकेचा तलाव स्वस्त: खासगी तरण तलावांमध्ये पोहणे शिकवणे हे आठ ते दहा हजार रुपयांमध्ये होते. त्या तुलनेत महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये दोन हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत पोहणे शिकविले जाते. पालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठीच्या अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पालिका प्रशासन हे अर्ज ऑनलाईन देत असल्यामुळे पहिले येणाऱ्यांना पहिले प्राधान्य अशा नियमाने हे अर्ज दिले जातात.
अर्जाकरिता सर्वच वयोगटात उत्सुकता: पोहण्यासारखा व्यायाम इतर कोणताच नसल्यामुळे पोहल्यामुळे शरीराच्या सर्वच भागांना चालना मिळते आणि त्यांचा व्यायाम देखील होतो. त्यामुळे सर्वच वयोगटातील नागरिक ठाणे पालिकेच्या तलावावर पोहण्यासाठी गर्दी करतात.
अधिकाऱ्यांनाही येतो हुरूप: क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर मोठा हुरूप येतो. जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळावा यासाठी क्रीडा विभाग पुढे असतो. केवळ सहभाग वाढवण्यापेक्षा जलपटूंना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत ठाणे पालिका प्रशासनाकडून केला जातो. चांगल्या प्रतीचे जलपटू निर्माण करण्याचे काम महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून केले जात आहे.