ठाणे - केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत. या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा अन्यथा टाळे ठोका असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना दिला. डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर केडीएमसीमध्ये सर्व संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी कंपन्यांना इशारा दिला.
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणा कारखान्यांची तपासणी करून जी सुरक्षा उपकरणे लावण्यास सांगतील ती संबंधित कंपन्यांनी लावावी. ही उपकरणे लावायची की, कंपनीला कुलूप लावायचे हा निर्णय कंपनी मालकांनी घ्यावा, असे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे, घातक केमिकल वाहून जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आणि तिसऱ्या टप्प्यात घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपण 15 दिवसांची मुदत दिली असून, त्या कंपन्या कोणत्या? त्यांना कुठे जागा द्यायची? कोणाला कोठे हलवायचे याबाबतही आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवलीसाठी 100 कोटींचा निधी
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आम्ही काही वचनं दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी महापालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे 100 कोटी रुपये कसे वापरले जातात त्याची तपासणी करून मग पुढील निधी दिला जाणार आहे. येथील नागरिकांना आपण एका चांगल्या शहरात राहत असल्याचा अभिमान वाटेल असे शहर निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांच्याबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.