ठाणे - मुंबईत रेल्वेचे धोकादायक पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलाचे 'स्ट्रक्चरल ऑडीट' करण्यात आले होते. या ऑडीटनंतर धोकादायक असलेले पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले असून या पार्श्वभूमीवर आज कल्याण ते कसारा मार्गावर सकाळी 11.15 ते 3.15 वाजण्याच्या दरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक करण्यात आला. या दरम्यान काही ठिकाणावरील अतिधोकादायक पूल पाडण्यात आले.
एल्फीस्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. या ऑडीटच्या अहवालात अनेक पादचारी पूल धोकादायक असल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर ते धोकादायक पूल पाडून नवे पादचारी पूल तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने 11.15 ते 3.15 वाजण्याच्या दरम्यान चार तासाचा मेगाब्लॉक घेतला होता.
यावेळेत कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील शहाड स्टेशनवरील अतिधोकादायक झालेला पादचारी पूल आज पाडण्यात आला. टिटवाळा जवळील नव्या पादचारी पूलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. आसनगाव रेल्वे स्थानकातील पादचारी पूलही या वेळेमध्ये पाडण्यात आला.
दरम्यान, टिटवाळा स्थानकात नवा पूल उभारण्यात यावा अशी रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी होती. त्यामुळे आज गर्डर टाकण्याचे काम पार पडले आहे. लवकरात लवकर पूलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात आली. मेगाब्लॉक काळात रेल्वे लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होवू नये, म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने कल्याण टिटवाळा मार्गावर 7 ज्यादा बसेस सोडल्या होत्या.