ठाणे - मुंबई - नाशिक महामार्गावरील पडघाजवळ एसटी बसने कंटेनरला धडक दिल्याची घटना घडली आहे. भरधाव बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा - ठाण्यात हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू
पनवेल आगाराची बस प्रवाशांना घेऊन धुळ्याला निघाली होती. ही बस भोईरगाव येथील साईधारा कॉम्पलेक्स येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. अपघातातील जखमींवर पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. कंटेनर चालकाने पडघा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी बस आगारातील अधिकारी व कर्मचारी तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळी दाखल झाले.