ठाणे - लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १ हजार ५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा अद्याप तरी प्रत्यक्षात उतरलेली नाही. याबाबत भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यानी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचे ट्वीटरवर वाभाडे काढले. रिक्षावाले विचारत आहेत, “आमचे १ हजार ५०० रुपये कधी देणार, का तिघांनी ५००-५००-५०० असे वाटून घेतले?” असे ट्वीट डावखरे यांनी केले असून त्यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - २० रुपये न दिल्याने चाकूने केले सपासप वार, तरुणाचा जागीच मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांच्या खात्यात १ हजार ५०० रुपये जमा करण्याची घोषणा १३ एप्रिल रोजी केली होती. मुंबई-ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाखांहून अधिक परमीटधारक रिक्षाचालक आहेत. १ एप्रिलपासून राज्य सरकारचे निर्बंध व १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रिक्षा व्यवसाय पुरता डबघाईला आला आहे. एकीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती, तर दुसरीकडे लॉकडाऊन भंगप्रकरणी कारवाईचा दट्या, अशा दुहेरी संकटात अनेक रिक्षाचालकांनी घरातच बसणे पसंद केले आहे. त्यामुळे, रिक्षाचालकांना लवकर मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नसल्याच्या प्रतिक्रिया रिक्षाचालक व्यक्त करतात.
केवळ घोषणा
केवळ श्रेय घेण्यासाठी रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात दमडीही मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवली. डावखरे यानी, रिक्षावाले विचारत आहेत, “आमचे १५०० रुपये कधी देणार ? का तिघांनी ५००-५००-५०० असे वाटून घेतले?” असे ट्वीट २१ मे रोजी करून एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारच्या मानसिकतेचेच वस्त्रहरण केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू