ठाणे - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अनेकांना मुंबईला कामावर जावे लागते. त्यांच्या प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे बेस्ट बस आहे. परंतु अपुऱ्या सुविधा आणि कोरोनाच्या विरोधात पुरेशी सुरक्षा मिळत नसल्याने बेस्टच्या कामगार कृती समितीने आजपासून संपाचा इशारा दिला होता. परंतु नागरिकांना होणारी असुविधा पाहता अनेक बेस्ट कर्मचारी कामावर हजर झाले.
बेस्टचे अनेक चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ठाण्याच्या तीन हात नाका येथून तुरळक प्रमाणात का होईना पण बसेस सोडल्या. सकाळपासून अनेक नागरिक द्विधा मनस्थितीत तीन हात नाका येथे बसच्या प्रतीक्षेत होते. बसेसची संख्या अत्यंत कमी असल्याने त्यांना त्रास होत आहे, असे अनेकांनी बोलून दाखवले. कोरोनापासून संरक्षण कारण्यासाठी आम्हाला पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने आमच्या जीवितास धोका असूनदेखील आम्ही जनसेवेसाठी कामावर हजर झालो आहे, याची सरकारने दाखल घ्यावी अशी विनंती बेस्ट कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.