ठाणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस आणि भाजपने बजरंग बलीच्या मुद्यावरून रान उडवले आहे. आज प्रचाराच्या तोफा थंड झाल्यानंतर बागेश्वर बाबानेही बजरंग बलीच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नसल्याचेही स्पष्ट केले केले. ते आज अंबरनाथ येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
'बजरंग बलीला विरोध करण्याचा अधिकार कोणालाच नाही' : बजरंग बलीच्या मुद्द्यावर बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले की, बजरंग बलीचा विरोध करण्याचा अधिकार कोणालाच नाही. सर्वांना आपल्या धर्माशी जोडून राहण्याचा आणि प्रत्येकाला वैयक्तिक श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे. पण बजरंग बलीसह संतांना विरोध करणे हे आपल्यासह देशासाठी दुर्भाग्याचे आहे. बजरंग दलावरील बंदीच्या मुद्यावर बागेश्वर बाबा म्हणाले कि, आधीच्या काळात व्यक्तींमार्फत देवाचा प्रचार व्हायचा, मात्र आता देवांमार्फत व्यक्ती प्रचार करीत असल्याचे ते म्हणाले. तसेच बाबांनी राजकीय प्रश्नांना बगल देत निवडणुकीमध्ये बजरंग बलीच्या नावाचा वापर करण्यावर नाराजी व्यक्त केली.
'मी मरेपर्यत कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही' : कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या विषयावर त्यांना विचारले असता, बजरंग दल ही एक विचारसरणी असून त्या विचारसरणीला समाजातील काही घटक विरोध करू शकतील. मात्र तेच घटक बजरंग बलीला मात्र प्रत्यक्षात विरोध करणार नाहीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, बागेश्वर बाबांना तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी निगडित आहात असे विजारले असता ते म्हणाले की, माझाही पक्ष आहे. ज्याचे नाव बजरंग बली आहे. याचे घोष वाक्यही आहे. - 'जो राम का नही हो किसीका नही'. तसेच आमचे चिन्ह बजरंग बलीची गदा आहे. त्यामुळे आम्ही मरेपर्यत कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही. शेवटी त्यांनी मायानगरी मुंबई माधव नगरी होणारच, असे म्हणत पत्रकार परिषदेची सांगता केली.