ठाणे: आरोपी मनोहर दामू सुरळकर यांचा मुलगा धम्मप्रिय (१९) हा एका हत्येच्या गुन्ह्यात २२ सप्टेंबर २०२१ रोजी जामिनावर सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी जात होता. त्यावेळी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली येताच शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय २१ वर्षे) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय २१ वर्षे) या दोघा आरोपींनी धम्मप्रियवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात धम्मप्रिय जागीच ठार झाला होता. तर वडील मनोहर दामू सुरळकर जखमी झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही कारागृहातच आहेत.
ओळख लपविण्यासाठी घातला बुरखा: २० फेब्रुवारी रोजी धम्मप्रिय हत्या प्रकरणी जळगाव न्यायालयात सुनावली असल्याने आरोपी शेख समीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात येणार होते. याची माहिती मृतक धम्मप्रिय याचे वडील मनोहर सुरळकर यांना मिळाली. मुलाच्या खुनाचा राग त्यांच्या डोक्यात कायम असल्याने त्याचा बदला घेण्यासाठीच मुलाची हत्या करणाऱ्या दोघांना संपविण्याचा त्यांनी कट रचला होता. त्यानुसार वडील मनोहर सुरळकर आणि साथीदार सुरेश रवी इंधाटे हे कुणालाही संशय येऊ नये, म्हणून दोघे चक्क बुरखा घालून मुस्लिम महिलांच्या पेहरावात न्यायालय परिसरात मंदिराजवळ बसले होते.
एकाला पकडले, दुसऱ्याने काढला पळ: मुस्लिम बुरखा पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबऱ्याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिली. त्यावेळी पोलीस पथकाने घटनस्थळी धाव घेत गोळीबार करून हत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेला सुरेश रवी इंधाटे याने तेथून पळ काढला.
आरोपीला पिस्तुलासह अटक: आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे पोलिसांना मंगला एक्सप्रेसमधून हत्यारांसह सुरेश नावाचा आरोपी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण स्थानकात मंगला एक्सप्रेस येताच सुरेश इंधाटे याला पिस्तुलासह अटक केली. आज त्याला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.