ठाणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूकसेवा बंद आहेत. अशातच आईच्या अंत्यविधीसाठी रिक्षाने यवतमाळला निघालेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. विजय प्रल्हाद कोसे (वय 55) त्या व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा- Coronavirus : दिलासादायक..! पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेची कोरोनावर मात
विजय कोसे यांच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त मिळताच वाहतुकीसाठीचे सर्व पर्याय बंद असल्याने विजय कोसे रिक्षाने (एमएच०४, जीएन ०८७८) यवतमाळला निघाले होते. दरम्यान, गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील मौजे लाहेजवळ त्यांचा अपघात झाला. रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा रिक्षा थेट दुभाजकावर आदळला. यात ते गंभीर जखमी झाले. शहापूर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत पोलीस हवालदार काशीनाथ सोनवणे यांनी विजयजवळ मिळालेल्या मोबाईलवरुन त्यांच्या घरी चौकशी केली. घरच्यांनी सांगितले, की विजय त्याच्या आईच्या अंत्यविधीसाठी रिक्षाने यवतमाळ येथे होता. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम करीत आहेत.