नवी मुंबई - राज्य सरकारने महिनाभरापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे आदेश काढून नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती केली होती. मात्र, या बदली आदेशाला सरकारने स्थगिती दिली. यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी पुन्हा अण्णासाहेब मिसाळ हेच कायम राहिले. मात्र, सरकारने आता ही स्थगिती मागे घेत अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली आहे.
मिसाळ यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली असून बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
कोण आहेत अभिजीत बांगर? -
बांगर हे 2008च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. युवा आणि धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. याअगोदर अभिजीत बांगर हे अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर 14 महिने त्यांनी नागपूरचे आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते. अभिजित बांगर यांनी 14 महिन्यांच्या कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली असून, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यानंतर त्यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून झाली. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. महिनाभरापूर्वी नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करून अभिजित बांगर नवी मुंबईचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बांगर यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता पुन्हा अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली असून, नवे आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला आहे. नवी मुंबईत दिवसागणिक वाढती कोरोनाबाधितांचा आकडा पाहता अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.