ठाणे- आदिवासी विकास महामंडळाने हमी भाव केंद्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाची मिलिंग करून तोच तांदूळ रेशनवर देण्याची जबाबदारी मिलर्सवर दिली आहे. मात्र, तसे न करता महाराष्ट्रातला चांगला भात काळ्या बाजारात विकून त्या बदल्यात स्वस्त आणि निकृष्ट, असा जुना तांदूळ सार्वजनिक व्यवस्थेत पाठवत असल्याचे समोर आले आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १ हजार २३० टन निकृष्ट तांदूळसाठा असलेले ५ ट्रक भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पकडून तांदळाची काळाबाजारी उघडकीस आणली आहे.
याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी चर्चा करून त्यांना सर्व प्रकाराची कल्पना दिल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी याबाबत श्रमजीवीने आवाज उठवून हा घोटाळा पुराव्यानिशी उघड केला होता. त्यावेळीही प्रत्यक्ष मिलिंग करणाऱ्या मिलर्सलाच हा खरेदी केलेला भात भरडाईला द्यावा, असे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. मात्र यावर्षीही मिलर्स ऐवजी काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे काम मिळवले. खरेदी केंद्रात जमा झालेला भात मिलमध्ये नेण्याचा वाहतूक खर्च, मिलिंगचा ४० रुपये प्रति क्विंटल खर्च, तसेच पुन्हा हा तयार तांदूळ पुरवठा विभागाच्या गोदामात जमा करण्याचा वाहतूक खर्च, असे सर्व खर्च अदा करून शासन स्थानिक जमा झालेल्या भाताचाच तांदूळ करून गरिबांना रेशनवर मिळावा, अशी ही व्यवस्था आहे. मात्र, त्या व्यवस्थेला काळिमा फासून हा काळाबाजार केला जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप श्रमजीवीने केला आहे.
असा होतो घोटाळा
जय आनंद फूड इंडस्ट्री कंपनी मालकाने महामंडळ मिलिंगचे काम घेतले. ८४ टन एवढे भात उचलून सर्व भात त्याने आपल्या मिलवर आणून त्याचे मिलिंग केले. त्यात शासनाने देऊ केलेले ५५ रुपये किंमत असलेले बारदान वापरून त्यावर वर्षानुसार कलर कोडिंग करून तो बारदानमध्ये भरलेला तयार तांदूळ पुरवठा विभागाच्या गोदामात पोहोचविणे अभिप्रेत होते. मात्र तसे झाले नाही. जय आनंद फूड कंपनीने महामंडळाच्या गोदामातला तांदूळ गुजरातच्या एक व्यापाऱ्याला काळ्या बाजारात विकला आणि त्या बदल्यात चक्क २०१८-१९ चा पंजाब आणि हरियाणा सरकारच्या खाद्य निगमचा तांदूळ हा हुबळी मार्केटच्या माध्यमातून पडघा मिलवर आणून तो पुन्हा शहापूर गोदामात पाठविण्याची तयारी होती.
खरेदी केलेला चांगल्या प्रतीचा भात २५ रुपये किलोने विकायचा. पुन्हा त्या बदल्यात द्यायला लागणारे ६४ टक्के तांदूळ हा १ हजार ६०० ते १ हजार ८०० प्रति क्विंटल कर्नाटकच्या हुबळी येथून मागवायचा आणि तोच तांदूळ थेट प्लास्टिक बॅगेत भरून रेशन गोडावूनला पाठवायचा असा हा घोटाळा आहे. यात भात उचलणे, मिलिंग करणे, पुन्हा तांदूळ पोहोचवणे हा सर्व खर्च शासनाकडून घ्यायचा. बारदान घेऊन तेही काळ्या बाजारात विकायाचे, असा सगळा गोरखधंदा आज पुन्हा उघड झाला आहे.
याबाबत, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्या पकडून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पंचनामा जबाब नोंदवून तब्बल १२९ टन माल असलेले पाचही ट्रक पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक राज्य प्रमुख गणपत हिलम, तालुका अध्यक्ष सुनील लोणे, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक जिल्हा जयेंद्र गावित, केशव पारधी, आशा भोईर, आदींचा सहभाग आहे. हे सर्व रात्री उशिरापर्यंत या कारवाई प्रक्रियेत होते. तर शहापूर येथे जिल्हा सचिव दशरथ भालके, तालुका सचिव प्रकाश खोडका यांनीही शहापूर येथे २ गाड्या पकडून तहसीलदार यांच्या ताब्यात दिल्या.
भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट दिली. सरचिटणीस बाळाराम भोईर यांनीही या ठिकाणी भेट देऊन संताप व्यक्त केला. यावेळी पुरवठा निरीक्षक पी.यु. चव्हाण, राऊत आणि संजीवनी वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे, पोलीस भरत शेगर, पी. एन देसले इत्यादी उपस्थित होते. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेतर्फे करण्यात आली.
पंचनाम्यात आढळलेल्या ठळक बाबी
गाडी क्र. केए. २५ एबी २६१२ या गाडीमध्ये पंजाब राजस्थानच्या खाद्य निगमची प्रिंट असलेल्या बारदानामध्ये ५० किलोच्या ६०० गोणी, असे एकून ३० मेट्रिक टन तांदूळ हे २०१८-१९ चा शिक्का असलेले आढळून आले.
गाडी क्र. केए. १९ एबी ४०७१ या गाडीमध्ये पंजाब, राजस्थानच्या खाद्य निगमच्या वर्ष २०१८-१९ ची प्रिंट असलेल्या ५० किलोच्या ५०० गोणी, असे एकूण २५ मेट्रिक टन धान्य आढळून आले.
गाडी क्र. केए ६३. २२१२ या गाडीमध्ये हरयाणा राज्यशासनाच्या खाद्य निगमच्या वर्ष २०१८-१९ ची प्रिंट असलेल्या ५० किलोच्या ४९७ गोणी, असे एकूण २४.८५० मेट्रिक टन धान्य आढळून आले.
गाडी क्र. एच.आर ७४ ए. ८०८२ ही गाडी हरयाणा राज्यातील असताना कर्नाटक राज्यातून प्लास्टिकच्या पांढऱ्या गोणीमध्ये ५० किलोच्या ५०० गोणी, असे एकूण २५ मेट्रिक टन धान्य आढळून आले.
गाडी क्र. केए.६३. ०२९३ या गाडीमध्ये पंजाब राज्यशासनाच्या वर्ष २०१८-१९ ची प्रिंट असलेल्या ५० किलोच्या ५०० गोणी, असे एकूण २५ मेट्रिक टन शासनाचा शिक्का असलेल्या बारदानात आढळून आले.
पंजाब, हरियाणा येथील माल कोणत्या तालुक्याचा, जिल्ह्याचा कोणत्या दुकानाचा, इथवर कसा आला? मध्ये कुठेही तपासणी झाली नाही का ? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तर शोधणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वाशी येथे झालेल्या गैरव्यवहारातही हेच व्यापारी होते. मात्र योग्य कारवाई न झाल्याने पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याचे त्यांनी धाडस केले. आधीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, ही संघटित गुन्हेगारी असून या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करावी, अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.