ठाणे - गेल्या दहा दिवसांपासून प्रत्येक दिवशी कोरोना रूग्णांची संख्या पाहता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळात आहे. तर, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यात वाढल्याचे दिसून आले. कल्याण-डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येने द्विशतकाचा आकडा पार केला असून रविवारी (दि. 21 जून) तब्बल 254 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यास पालिका प्रशासन राबवत असलेल्या उपाययोजना निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून येत आहेत.
रविवारी (दि. 21 जून) सूर्यग्रहणाकडे सर्वांचे लक्ष असतानाच कल्याण-डोंबिवलीला मात्र कोरोनाचे ग्रहण लागले असून ते काही केल्या सुटण्याचे नाव घेत नाही. रविवारी देखील कल्याण, डोंबिवली शहरांत कोरोनाचा उद्रेक झाला असून मागील 24 तासांत तब्बल 254 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. या 254 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 511 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 40 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर 1 हजार 398 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 10 दिवसांत कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे. तसेच सरकारने आणि पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र, शहरात नागरिकांकडून सूचनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाच्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राबवित असलेल्या उपाययोजना अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. रविवारी (दि. 21 जून) 3 हजार 870 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर 1 हजार 59 रुग्णांनी रविवारी (दि. 21 जून) कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - कल्याण परिमंडळात महावितरणच्या सहा कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’; कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन