ठाणे - कोरोनामुळे सुरू असणाऱ्या लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच हातावर पोट असणाऱ्या हजारो मजुरांच्या खिशात पैसा नसल्याने पोटात अन्न नाही. त्यामुळे अनेक मजूर आणि कामगार पायी आपल्या घरचा रस्ता धरत आहेत. पायी उत्तरप्रदेशला जाण्याचा निर्णय घेणाऱ्या २५० परप्रांतीय मजुरांना कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परिणामी अनेक उद्योग-व्यवसाय गेल्या महिन्याभरापासून ठप्प पडल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. यामध्ये परप्रांतीय मजूरांची संख्याही मोठी आहे. राज्याच्या विविध भागातून मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या पध्द्तीने लपून छपून हे परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांत असे अनेक प्रकार समोर आले असून काहीसा असाच प्रकार कल्याणमध्ये घडला.
गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमधून अनेक जण पायी चालत असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता हे मजूर पटना (बिहार), अलाहाबादला(उत्तरप्रदेश) जात असल्याचे समोर आले, अशी माहिती कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. यासर्व मजुरांना कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान परिसरात आणून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. हे सर्व मजूर डोंबिवलीतील टाटा पॉवर, सोनारपाडा परिसरातील चाळींमध्ये राहत होते. या सर्वांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात कल्याणमधील महाजन वाडी आणि महावीर हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे.