ठाणे- भररस्त्यात अज्ञात नराधमाने एका २२ वर्षीय विद्यार्थिनीला जबरदस्ती पकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प क्र. ४ परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणच्या घरासमोरील कट्ट्यावर हळूहळू चालत अभ्यास करत होती. त्यावेळी २० ते २१ वयोगटाच्या व अंगात लाल व काळ्या रंगाचा टीशर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला अज्ञात व्यक्ती त्याठिकाणी आला. या व्यक्तीने अचानक त्या विद्यार्थिनीला मागून पकडून तिच्याशी घृणास्पद कृत्य करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडललेल्या या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनीने आरडाओरड केली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने घटनास्थळावरून धूम ठोकली.
दरम्यान, या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनी भयभीत झाली असून तिने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे भरदिवसा रस्त्यात हा प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत असून नराधमाला पोलिसांनी त्वरीत शोधून त्याला अटक करावी, अशी मागणी परिसरातील पालकांनी केली आहे.
हेही वाचा- ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार, पीडिता चार महिन्यांची गर्भवती