ठाणे - भिवंडीतील 'शाहीन बाग' आंदोलनाच्या 21 व्या दिवशी तिरंग्यासह भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी सुमारे ७ हजारहून अधिक मुस्लीम महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. जोपर्यंत केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी दिली.
31 जानेवारीपासून सुरू केलेल्या शाहीन बाग आंदोलनाचा आजचा 21 वा दिवस होता. यावेळी सुमारे ७ हजारहून अधिक मुस्लीम महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तर, राज्यसभेचे माजी खासदार मौलाना उबेदुल्लाह खान व प्रा. सुभान अली शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मुस्लीम मावळे या विषयावर मुस्लीम महिलांसह नागरिकांसमोर मार्गदर्शनही केले.
केंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए ), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ( एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंस्था नोंदणी (एनपीआर) कायदा देशभर लागू केला आहे. हा कायदा राज्यघटना विरोधी असल्याचा आरोप करत हा कायदा त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी भिवंडीतील चवींद्रा रोड मिल्लत नगर येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनात संघर्ष समितीचे सहकारी दिवस रात्र जगता पहारा देत आहेत. 31 जानेवारी पासून सुरु केलेल्या शाहीन बाग आंदोलनाचा आजचा 21 वा दिवस होता. त्यादिवशी सायंकाळच्या सुमारास शाहीन बागेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सुमारे सात हजारहून अधिक मुस्लिम महिला यावेळी उपस्थित होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आज सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनात देखील सर्व जाती धर्माचे नागरिक व महिला सहभागी झाल्या आहेत. केंद्र शासनाने लागू केलेल्या घटनाविरोधी कायद्याचा विरोध करत आहोत. जोपर्यंत केंद्र शासन या आंदोलनाची दाखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.