मीरा भाईंदर (ठाणे) - राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना मीरा भाईंदर मधील एका हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले आहे. मात्र, एकाच हॉटेलमधील एवढे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे.
ठाणे-घोडबंदर रोडवरील वर्सोवा वाहतूक केंद्र जवळील एक्सप्रेस इन हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील 49 पैकी 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी (18 फेब्रुवारी) या हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल शुक्रवारी आल्यानंतर हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. तत्काळ मीरा-भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल सील करून 21 पॉझिटिव्ह वगळता इतर कर्मचाऱ्यांना रामदेव पार्कमधील अलगीकरण कक्ष समृद्धी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
मीरा भाईंदरमध्ये रुग्णसंख्येत वाढ
मीरा भाईंदर शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दिवसागणिक 20 ते 30 नवे कोरोना बाधित रुग आढळून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. मात्र, हॉटेलमध्ये एकाच वेळी 21 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माक्स सॅनिटायझरचा वापर कमी होताना दिसत आहे. तसेच, रुग्ण संख्येतील वाढ कमी झाल्याने प्रशासनदेखील सुस्त झाले होते. परंतु, पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याचे आढळून येत आहे. नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.