ठाणे- शहरात शुक्रवारी 197 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यात शुक्रवारी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 63 वर गेला असून 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1757 एवढी आहे, तर प्रत्यक्षात 1108 रुग्ण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी ठाण्यात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत 5 नव्या रुग्णांची वाढ झाली तेथील एकूण संख्या 91 वर, वर्तकनगर प्रभाग समितीत 7 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. तर कोरोनाबधितांची संख्या 85 वर गेली. लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीत सर्वाधिक आणि आतापर्यंतचा उच्चांक असलेल्या नव्या 74 रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 499 आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत 19 नव्या रुग्णांची भर पडून रुग्णांची संख्या 188 वर पोहोचली आहे. उथळसर प्रभाग समितीत 12 नव्या रुग्णांचा संख्याने एकूण संख्या148 वर, तर वागळे प्रभाग समितीत 22 नव्या रुग्ण आढळले असून एकूण संख्या 277 एवढी आहे. कळवा प्रभाग समितीत 22 नव्या रुग्णांची नोंद केली असूनसंख्या 147 वर गेली आहे. मुंब्रा प्रभाग समितीत 22 नव्या रुग्णासोबत एकूण रुग्णांची संख्या 244 वर पोहोचली आहे. तर दिवा प्रभाग समितीत मात्र नव्या 14 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 78 वर पोहचलेली आहे.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे शहर कोरोनाचा हब झाल्याचे चित्र आहे. मागच्या आठवडाभर ठाण्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असून वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात ठाणे पालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने केलेली टाळाटाळ आणि त्यात स्ट्रेचर वरच रुग्णाचा झालेला मृत्यू हे रुग्णालयाच्या प्रशासन गंभीरपणे परिस्थिती हाताळत नसल्याचे उदाहरण आहे.
ठाण्यात आरोग्य सुविधेच्या तीन तेरा वाजल्या असल्याचे चित्र आहे. दोन आठवड्यापासून विविध पक्षाच्या नेत्यांच्या आणि ठाणेकरांच्या मागणीनुसार त्वरित दक्षता घेऊनही रुग्णवाहिकेची व्यवस्था पालिका प्रशासन करू शकत नाही. रुग्णांना वाट पाहावी लागते यावरूनच ठाणे पालिकेची आरोग्य सेवा किती सक्षम आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नसल्याची भावना ठाणेकरांनी व्यक्त केली.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विविध ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे पालिका प्रशासन क्वारंटाइन सेंटरमधील संशयित व्यक्तींची व्यवस्थित देखभाल करु शकत नाही. पालिकेचे संबंधित अधिकारी तक्रार केल्यानंतरही कुठलीच दखल घेत नसल्याचे चित्र आहे. क्वारंटाइनमधील ठाणेकरांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
क्वारंटाइन सेंटरमध्ये देण्यात येणारे जेवण हेही सकस नसून निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार समोर आली आहे. ठाणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात क्वारंटाइन सेंटरची वाढ केली आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या क्वारंटाइन सेंटरची व्यवस्था चोख ठेवण्यात अपयश आल्याने पालिका अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.