ठाणे - चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाचा जाळ्यात ओढून तिच्यावर दोन प्रियकरांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीसोबत पळून जाण्यास पहिल्या प्रियकराने नकार दिल्याने ती आसरा घेण्यासाठी तिच्या ओळखीच्या शिक्षकाच्या घरी गेली. मात्र, शिक्षकानेही तिला आसरा देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. दुसऱ्या प्रियकराने तिला शिर्डीला नेऊन तिच्यावर ८ दिवस अत्याचार केला.
या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय जाधव (१९, रा. गायकवाड पाडा, उल्हासनगर ) चंद्रकांत भोईर (३३, रा. माणेरे , उल्हासनगर ), अजित सरगर (१९, रा. धनजेवाडी, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी तरुणीला १० वर्षांची शिक्षा
अल्पवयीन पीडित मुलगी उल्हासनगरमधील पाच नंबर परिसरात राहते. त्याच परिसरात राहत असलेल्या अक्षयचे आणि तिचे प्रेमसंबंध तयार झाले. त्यानंतर आरोपी अक्षयने पीडित मुलीवर २०१९ च्या जून महिन्यात तिच्यावर प्रेम टेकडी परिसरात वारंवार अत्याचार केला. ७ डिसेंबरला पीडित मुलगी घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन अक्षयला भेटली. मात्र, त्याने तिच्यासोबत पळून जाण्यास नकार दिला. त्यानंतर ती तिच्या ओळखीचे शिक्षक चंद्रकातच्या घरी आसरा घेण्यासाठी गेली. शिक्षकानेही तिच्यावर घरातच बळजबरीने अत्याचार केला.
पीडित मुलगी घरी परत न जाता ८ डिसेंबरला कल्याण रेल्वे स्थानकात आली. तिथे तिची ओळख सोलापूरच्या अजितशी झाली. त्यानेही तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला पुण्याला नेले. त्यानंतर लग्न करणाच्या बहाण्याने शिर्डीला नेऊन तिच्यावर ८ दिवस अत्याचार केला. दरम्यानच्या काळात पीडित मुलीच्या आईने मुलगी घरातून दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तिचा शोध सुरु केला. तिच्या मोबाईलचे लोकेशन शिर्डी येथे दाखवत असल्याने पोलिसांनी शिर्डीला जाऊन आरोपी अजित आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले.
हिललाईन पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकासह दोन प्रियकरांना अटक केले. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. पी. मायने करत आहेत.