सोलापूर - कोरोनामुळे शहराची परिस्थिती भयंकर वाईट होत चालली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भयावह घटना घडली आहे. एका महिलेने घराच्या आणि पतीच्या रोजगाराच्या चिंतेत रस्त्यावरच प्राण सोडला आहे. गंगा प्रकाश नायकवडी, असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. महामार्गावर विस्थापित झालेल्याना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. उलट कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाले. यामध्ये अनेकांचे रोजगार गेले. रस्त्यावर राहून भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. अखेर गंगा प्रकाश नायकवाडी या महिलेने कोंडानगर येथील रस्त्याचा कडेला प्राण सोडला. त्याला उपचारसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण कोरोनामुळे प्रशासनानेदेखील उपचारासाठी दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली होती.
सप्टेंबर महिन्यात पाडण्यात आली होती घरे -
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर-गाणगापूर महामार्गचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होत असताना सोलापूर शहराला चिटकून असलेल्या कोंडानगर येथे रस्त्याच्या कडेला अनेक जणांची छोटी-मोठी घरे आणि झोपड्या होत्या. महामार्ग प्रशासन विभागाने पोलीस बंदोबस्त लावून सप्टेंबर महिन्यात सर्व घरे पाडली. अतिक्रमण आहे, असा खुलासा करत महामार्गाचे काम पूर्ण केले. येथे अनेक गोरगरीब नागरिक राहायला होती. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जाऊन स्वतः भेट देऊन पुनर्वसन करू आणि महामार्ग विभागाकडून आर्थिक मोबदला मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. अनेक जण आर्थिक मोबदला मिळेल, ही अपेक्षा बाळगून होते. या अतिक्रमण कारवाईत गंगा प्रकाश नायकवडी याचीदेखील झोपडी पाडण्यात आली होती. ती चार लहान लेकरांना घेऊन महामार्गाच्या पुलाखाली पतीसोबत राहत होती.
लॉकडाऊनमुळे पतीचा रोजगार गेला -
सोलापुरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे लॉकडाऊन सुरू झाले. अनेक जणांचे व्यवहार ठप्प झाले. यामध्ये अनेकांचे रोजगार गेले. प्रकाश नायकवडी यांनादेखील आपला रोजगार गमवावा लागला. आपले घर गेले आणि आता पतीचा रोजगार देखील गेला. या चिंतेत गंगाची प्रकृती ढासळत गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी गंगाला सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. पण कोविड रुग्णांमुळे सामान्य रुग्णालय फुल्ल भरले होते. त्यामुळे सामान्य रुग्णालय प्रशासनानेदेखील गंगाला दाखल करून घेतले नाही. शेवटी त्यांना पुन्हा कोंडानगर येथील महामार्गच्या पुला खाली आणून ठेवले. शेवटी शुक्रवारी सायंकाळी त्यांनी पुला खाली प्राण सोडला.
राहायला घर नाही -
गंगा नायकवडी यांना 13 वर्षाची ऐश्वर्या, 9 वर्षाचा आकाश आणि 4 वर्षांची रेणुका आणि 3 वर्षांचा समर्थ अशी चार मुले आहेत. आईविना ही मुले पोरकी झाली आहे. या चौघांना राहण्यासाठी घरदेखील नाही आणि त्यांच्या वडीलांना रोजगारदेखील नाही.
हेही वाचा - दिल्ली ऑक्सिजन संकट : आपत्कालीन स्थितीसाठी सरकार ठेवणार राखीव ऑक्सिजन साठा