पंढरपूर (सोलापूर) - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच वाखरी येथे वारकऱ्याकडून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हे मार्गही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर , आमदार प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, चंद्रकांत पाटील, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह आदी मान्यवर तसेच संत मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वारकरी संप्रदायातील संत मंडळींना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.
पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत, असे सांगून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठू माऊलीचा आशीर्वाद असेल, असेही त्यांनी सांगितले. प्राचीन काळापासून वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचा ही पुढाकार असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.