सोलापूर : राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यात महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके तर महायुतीचे समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. तसेच स्वाभिमानाचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनही मैदानात आहेत. कोरोना नियमांचे योग्य ते पालन केले जात आहे.
मतदारसंघात दिव्यांग मतदार 1785 आहेत. 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ मतदार 13689 आहेत. यापैकी 3252 मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ज्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिक मतदारांनी टपाली मतदान केले नाही. त्यांना बूथवर जावून मतदान करता येणार आहे.
मतदारसंघात 1 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार व 1 लाख 62 हजार 694 स्त्री मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. पोटनिवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रे असून, त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. यामध्ये 16 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक केली आहे. तसेच 252 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग व्यवस्था करण्यात आली आली आहे. यासोबतच 326 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती शंभरकर यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या मतदारास शेवटच्या एक तासामध्ये कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करुन मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मतदानासाठी 2620 आधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 550 पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच 1 हजार आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक केली असून, 1310 राखीव कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या सुररक्षिततेसाठी 90 हजार मास्क, 8 हजार 500 फेस शिल्ड, 4800 बॉटल सॅनिटायझर, 550 पल्स ऑक्सिमीटर, सोडियम हायपोरेट 2500 लिटर मतदान केंद्रावर पुरविण्यात येणार आहे.