पंढरपूर - राज्य सरकारकडून घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांसाठी 7 ऑक्टोबरपासून उघडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिर स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना पांडुरंगाचे दर्शन देण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
विठ्ठल मंदिराची स्वच्छता मोहीम -
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सहा महिन्यापासून भाविकांच्या प्रतिक्षेत आहे. राज्य सरकारकडून 7 ऑक्टोबरपासून विठुरायाचे मंदिर उघडायला परवानगी देण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून दोन दिवसापासून विठुरायाच्या मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा, मुख्य सभामंडप, सोळखांबी, नामदेव पायरी स्वच्छ करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
हेही वाचा - न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी
विठ्ठल मंदिर समितीची 5 ऑक्टोबरला बैठक -
मंदिरे खुले करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर विठ्ठल मंदिर समितीकडून 5 ऑक्टोबरला बैठक बोलावण्यात आली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. बैठकीत विठुरायाच्या दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे.
विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त -
विठ्ठल मंदिरावर उपजीविका असणारे व्यापाऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या दीड वर्षापासून सुमारे सहा मोठ्या वाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. घटस्थापनेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे पंढरपुरातील आर्थिक गाड्यांना चालना मिळणार आहे. पंढरपुरातील व्यापार्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे फटाके वाजवून स्वागत केले आहे.