सोलापूर - चेन्नई येथील एलिफंट गेट पोलीस स्टेशन हददीमध्ये काही दिवसांपूर्वी तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील हैदराबाद रोडवर अगदी सिनेस्टाईल पाठलाग करत या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडून एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांना मिळाली होती माहिती
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एलिफंट रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात इसमांनी एका कुटुंबातील तिघांची हत्या केली होती. यानंतर हे आरोपी लाल रंगाच्या गाडीमधून हैदराबाद-सोलापूर महामार्गावरुन जात असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना समजली होती. त्यानुसार कारवाई करत त्यांनी कैलास जालिंदर पाखरे (वय ३२, चेन्नई, सध्या लोणी काळभोर पूणे), विजय उत्तम कांबळे (वय २८, औरंगाबाद रोड, अहमदनगर) आणि रविंद्र जगन्नाथ कर (वय २५, रा सिध्दार्थ नगर, जुजला नगर पुणे) या तीन संशयित आरोपींना अटक केली.
सिनेस्टाईल अटक..
मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांनी लाल रंगाच्या गाडीचा शोध सुरू केला होता. यावेळी संशयित कार बोरामणी गावापासून पुढे सोलापूरच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सावधपणे या कारचा पाठलाग सुरू ठेवला. तसेच, पुढे तामलवाडी आणि मार्केट यार्ड येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. मार्केड यार्डजवळील नाकाबंदी पाहताच आरोपींनी यू-टर्न घेत पुन्हा बोरामणी गावाच्या दिशेला येण्यास सुरुवात केली. आरोपींनी गाडी वळवताच पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्यांची गाडी अडवली, तेवढ्यात नाकाबंदीच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांची एक गाडीही त्याठिकाणी आली, आणि 'पुलिस ने तुम्हें चारों तरफ से घेर लिया है' असा चित्रपटामध्ये असतो तसा सीन तयार झाला. यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याकडील रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : अल्पवयीन मूक बधिर मुलीवर अत्याचार; सोलापुरातील संतापजनक प्रकार