पंढरपूर - सांगोला शहरातील एखतपूर येथे घरभाडे मागितल्याच्या कारणावरून व प्रकरण मिटवतो, असे म्हणून शिक्षकास मारहाण करून कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेऊन प्लॉट नावावर कर अन्यथा वीस लाख रुपये दे, अशी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सांगोला पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार
सांगोला तालुका पोलिसांनी कडुबा निवृत्ती खरात (वय 38, सध्या रा. एखतपूर रोड, सांगोला), पाराप्पा संभाजी ढावरे ( 39, सध्या रा. वासुद रोड, सांगोला), विनोद पोपट ढोबळे (वय 43, रा. बनकर वस्ती, सांगोला) व अनोळखी आरोपीपैकी 1 अनोळखी इसम यांचा समावेश आहे. या आरोपींपैकी कडुबा खरात हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सेवानिवृत्ती शिक्षकाकडे वीस लाख रुपये खंडणीची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी नवले यांचे सांगोला येथे अष्टविनायक अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये कोंडिबा निवृत्ती खरात, पराप्पा ढावरे यांना एक प्लॉट भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिला होता. त्यानंतर नवले यांनी भाडेकरूंना भाड्याची मागणी करूनही दिले नाही. मात्र भाडे थकत गेल्यामुळे नवले यांनी भाडे मागण्यास सुरुवात केली. त्यावरूनच नवले यांना 19 फेब्रुवारी रोजी सांगोला शहरातील मार्केटयार्ड येथे बोलावून पाच जणांनी नवले यांना मारहाण केली. 'तू आमच्या बायकोला फोन का केलास, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो' असे ब्लॅकमेल करू लागले. त्यानंतर खरात व त्याच्या साथीदारांनी नवले यांना अपहरण करण्याच्या हेतूने टेम्पोमध्ये बसून स्मशानभूमीमध्ये नेले. तेथे मारहाण करत कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेत 'तुला आता जाळून टाकतो, एक तर वीस लाख रुपये खंडणी दे किंवा एक प्लॉट नावावर करून दे' अशी मागणी आरोपींनी केली होती. शिवाजी नवले यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सांगोला पोलिसांनी चौघांना अटक केली.