सोलापूर: गाई-म्हशींच्या शेणामुळे गल्लीतील रहिवाशांना त्रास होतो, असे सांगितल्याचा राग धरून एका व्यापाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. युवराज लक्ष्मण यलशेट्टी असे जखमी व्यक्तीचे नाव असून सोमवारी सकाळी कुंभारी वेस येथे त्यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात राजू हांडे (रा. शिवगंगानगर, शेळगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेळगी परिरारात राजू हांडे याचा गाई-म्हशींचा मोठा गोठा आहे. या गोठ्यात या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात शेण मिळते. सध्या पावसाळा सुरू आहे असल्याने या शेणामुळे डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढत आहे. स्वच्छता ठेवा किंवा या जनावरांची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करा, अशी मागणी आजूबाजूच्या नागरिकांनी राजू हांडेकडे केली. याबाबत रविवारी रात्री एक बैठकदेखील झाली. मात्र, या प्रकरणाचा डोक्यात राग धरून सोमवारी सकाळी राजू हांडे याने एका मित्रांसोबत युवराज यलशेट्टी यांच्यावर तलवारीने हल्ला केला. युवराज यांनी हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. यात यलशेट्टी यांच्या दोन्हा हातांना जखमा झाल्या.
या हल्ल्यानंतर शेळगी भागात राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. राहिवाशांनी गाई-म्हशींच्या शेणामुळे होणाऱया त्रासापासून व गुंड प्रवृत्तीच्या राजू हांडेपासून संरक्षण द्या, अशी मागणी जोडभावी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, युवराज यलशेट्टी यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजू हांडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.