पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यात महावितरणकडून शेती पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर वीज कनेक्शन तोडणी सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील दोन दिवसापासून वीज कनेक्शन तोडणी मोहीम सुरू होती. मात्र माळशिरस स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेत अकलूज येथील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात एक तास ठिय्या आंदोलन केले. महावितरणकडून तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडण्याची मागणी माळशिरस स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी केली. त्यानंतर वीजवितरण कंपनीकडून तत्काळ वीजजोडणी करून वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर थकबाकी
सोलापूर जिल्ह्यामध्ये घरगुती वीजबिल व शेती पंपाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी वीजवितरण कंपनीकडून घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वीजवितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू आहे. त्यासाठी महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी थकीत बिल लवकरात लवकर भरावे, असे आवाहन अकलूज येथील मुख्य कार्यकारी अभियंता अनिल वडर यांनी केले.
जिल्ह्यात महावितरणकडून एक तास वीजपुरवठा
सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दिवसभरातून दहा तास शेतीसाठी वीज दिली जात होती. ती आता महावितरणकडून केवळ एक तास देण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
वीजवितरण कार्यालयात स्वाभिमानीचा ठिय्या
माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे माळशिरस स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. अकलूज येथील वीजवितरण कार्यालयात स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.