सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केलेले काम हे सर्वोत्कृष्ट असल्याचे मत देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. देशाने आणिबाणी पाहिली, युद्ध पाहिले पण सध्याची परिस्थिती ही वेगळीच आहे. त्यामुळे जनतेने सरकारने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहे. सुशीलकुमार शिंदे हे सध्या त्यांच्या सोलापुरातील शेतात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी योग्य वेळीच दखल घेत योग्य ते निर्णय घेतले. त्यामुळे सोलापूर जिल्हा सध्यातरी सुरक्षित आहे. सोलापुरातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाला मी सॅल्युट करतो, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.
सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव स्थितीमध्ये सोलापूरचे प्रशासन चांगले काम करत आहे. नागरिकांनीही ही बऱ्याच प्रमाणात शिस्त पाळली आहे याचे समाधान वाटते अशीच शिस्त पुढील काहीकाळ पाळली तर बरे होईल असेही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. सुशीलकुमार शिंदे हे लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या शेतात थांबले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात शिंदे यांचे शेत आहे.