बार्शी (सोलापूर) - बार्शी नगरपरिषद निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बार्शीतील स्थानिक नेत्यांकडून नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका येथे घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, या मागणीसाठी शिवसेनेकडून पाच मार्चला नगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच मनात राग धरून राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालय व अन्नछत्रावर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे. याबाबत बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वादाला सुरुवात
पाच मार्चला बार्शी नगरपरिषदेवर शिवसेनेकडून घरपट्टी व पाणीपट्टी माफी मिळावी या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावर मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. राऊत गटाच्या वतीने त्याला विरोध करणारा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. यातूनच दोन्ही गटांमध्ये वादाला सुरुवात झाली होती.
बार्शी शिवसेना कार्यालयाची तोडफोड
राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 1) रात्री बार्शी येथील शिवसेना कार्यालयाची तोडफोड करून नासधूस केल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने बार्शी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच राऊत गटाच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी शेजारीच असलेल्या राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रातील अन्नाची नासधूस करून तोडफोड केली. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - अवैध वाळू उपसा : चौघांविरोधात गुन्हा दाखल, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त