सोलापूर - मोहिते-पाटलांना इतकी दिवस सत्ता दिली, त्यावेळी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत काम करायचा विचार त्यांच्या डोक्यात कसा आला नाही ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विजयसिंह मोहिते पाटलांना रणजितला सत्ता द्यायची होती. मोहिते पाटलांचा पोरगा कधी मुख्यमंत्र्याच्या तर कधी गिरीश महाजनांच्या घरासमोर तासंनतास उभा राहू लागला. इतकी वर्षे सत्ता भोगलेल्यांना असे इतरांच्या दारात उभे राहणे शोभते का? असेही पवार म्हणाले.
माढा लोकसभेचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. अकलूजचा दहशतवाद हा गल्लीबोळातला दहशतवाद असून तो संपवण्यासाठी मी स्वतः या भागात आमदाराप्रमाणे काम करेन असेही पवार म्हणाले. आपल्या जुन्या सहकाऱ्याबद्दल मी कधी आकसाने बोलणार नाही. पण, मोहिते-पाटलांनी फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नये. नाहीतर सहकारमहर्षींंना काय वाटेल? असेही पवार म्हणाले.
सरकारला पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची चिंता
देशात दुष्काळाचे सावट असताना पंतप्रधानांना शेतकऱ्याची काळजी नाही. या सरकारला शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांचे कर्ज माफ करण्यात रस आहे. पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांची चिंता मोदी सरकारला जास्त आहे. पिकवणाराच राहिला नाही तर खाणार काय ? याची चिंता आम्हाला लागली आहे, यासाठी परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे पवार म्हणाले.