सोलापूर - राज्याचे मृदू व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. गडाख यांच्याकडे सोलापूरसह सांगली जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी मनपा, जिल्हा परिषद निवडणुकांची रणनिती संपर्कमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आखली जाणार आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद तानाजी सावंत यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांची शासन दरबारातील प्रलंबित कामे करण्यासोबत राजकीय दादागिरीवरही शंकरराव गडाख लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
गडाखांवर जबाबदारी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शिवसेनेच्या नेत्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधला होता. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे मंत्री पालकमंत्री म्हणून आहेत त्या ठिकाणी शिवसेनेकडून संपर्कमंत्री देण्यात आले आहेत. अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दोन महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहे.
तानाजी सावंतांचे काय ?
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच पावसाळामुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यात सावंत यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. तानाजी सावंत यांचे जिल्हा संपर्कप्रमुखपद कायम आहे की नाही, याबद्दल सेनेचे नेते स्पष्टीकरण देत नाहीत. मात्र यादरम्यानच शंकरराव गडाख संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.