पंढरपूर - आषाढी एकादशी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पांडुरंगाचा वारी सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा करणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात सात दिवसाची संचारबंदी, तर आसपासच्या 9 गावांमध्ये चार दिवसांची संचारबंदी लागू असणार आहे. पोलीस प्रशासनाकडून नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपुरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
- पंढरीत सात दिवसाची, तर नऊ गावांमध्ये चार दिवसांची संचारबंदी -
येत्या 20 जुलैला पांडुरंगाची एकादशी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला वारकरी व भाविकांनी गर्दी करू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून पंढरीत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान पंढरीत असणार आहे. तर आसपासच्या नऊ गावांमध्ये 18 जुलै ते 22 जुलैपर्यंत संचारबंदीचे आदेश आहेत. पंढरपुरातील प्रत्येक भागामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत. यामध्ये वाखरी तळ, चंद्रभागा नदी पात्र, प्रदक्षिणामार्ग, विठ्ठल मंदिर परिसरावर विशेष लक्ष असणार आहे.
- वाखरी पालखी तळावर तालुका प्रशासनाकडून विशेष सुविधा -
19 जुलैच्या दुपारी तीन वाजेपर्यंत दहा मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून वाखरी पालखी तळावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तालुका प्रशासनाकडून विशेष सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन एकर परिसरातील पालखी तळ पूर्ण बॅरेगेटिंग करण्यात आले आहे. यामध्ये अधिकृत महाराज मंडळी व वारकऱ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर वाखरी ते विसावा अशी पायी दिंडी ची परवानगी देण्यात आली आहे. वाखरी पालखी तळावर दहा पालख्यासाठी मंडप व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वातंत्र्य भोजन व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी लागणारे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
- पोलिसांकडून साडेचारशे मठाची तपासणी -
भाविकांची गर्दी धर्मशाळा किंवा मठांमध्ये होऊ नये, यासाठी पोलिसांकडून साडेचारशे मठांमध्ये तपासणी करण्यात आहे. पंढरपूर शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. सात दिवसाच्या कालखंडामध्ये तीन हजार पोलिसांचा पंढरपुरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल व होमगार्ड अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर पंढरपूर शहरालगत नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाका-बंदी असणार आहे. जिल्हा नाकाबंदी, तालुका नाकाबंदी व पंढरपूर शहराची नाकाबंदी केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाकडून पंढरपुरात येणारे व जाणारे महामार्ग बंद केले आहेत.
हेही वाचा - शरद पवारांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर - खासदार अमोल कोल्हे