सोलापूर - भारताच्या इतिहासात कारगिल युद्धाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 1999 साली भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. भारतभर 26 जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या युध्दात भारताच्या हजारो सैनिकांना वीरमरण आले होते. कारगिल परिसराच्या दुर्गम टेकड्यांमध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या मोठ्या भागावर कब्जा केला होता. भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देत पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करत आपला प्रदेश परत मिळवला होता. पण यासाठी भारतीय सैनिकांना मोठी किंमत मोजावी लागली. सोलापुरातील निवृत्त सैनिक अरुणकुमार तळीखेडे यांनी कारगिल युद्धाचा प्रत्यक्ष थरारक अनुभव 'ईटीव्ही भारत'ला सांगितला. तब्बल 19 दिवस त्यांनी बॉम्ब शोधक दस्त्यात काम करून शत्रूंनी फेकलेले बॉम्ब आणि तोफ गोळे शोधून काढले आणि अनेक भारतीय सैनिकांचे प्राण वाचविले.
'हजारो बॉम्ब शोधून काढले आणि भारतीय जवानांचे प्राण वाचविले' -
अरुणकुमार तळीखेडे यांची नियुक्ती मणीपूर येथे बॉम्ब शोधक पथकात होती. जून 1999च्या शेवटच्या आठवड्यात आमच्या बॉम्ब शोधक दस्त्याला कारगिल येथे हजर होण्याचे आदेश मिळाले. तीन दिवसांत आपल्या कुटुंबाला सोडून दिल्ली येथे हजर व्हा, असा आदेश प्राप्त झाला होता. मनात देशभक्ती भरलेली असल्याने कोणताही विचार न करता, ताबडतोब पत्नीला घरी सोडून दिल्लीकडे रवाना झालो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीहून कारगिलकडे रवाना झालो. तब्बल 19 दिवस चाललेल्या या युद्धात डॉग स्क्वाडमध्ये बॉम्ब शोधण्यासाठी आम्ही सर्व युनिट कारगिलमधील डोंगरदऱ्यांमध्ये आणि बर्फामध्ये बॉम्ब शोधण्याचा कार्य करत होतो. न फुटलेले आणि बर्फात अडकलेली हजारो माईन आणि बॉम्ब शोधून काढली आणि निकामी केल्याचे अरुणकुमार तळीखेडे यांनी सांगितली.
'चार महिन्यांनी घरी परतल्यावर आईनेदेखील ओळखले नव्हते' -
26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय प्राप्त केला. पण त्यानंतर पुढील चार महिने युध्द सदृश परिस्थिती होती. कारगिल सारख्या दुर्गम आणि बर्फाळ क्षेत्रात राहणे कठीण होते. आणि शत्रूंनी डागलेले बॉम्ब शोधून काढणेदेखील खूपच कठीण होते. तरीदेखील पुढील चार महिने कारगिल परिसरात आमच्या टीमचे मुक्काम होते. आम्ही बॉम्बचा शोध घेत होतो. चार महिन्यांनंतर घरी जाण्याच्या किंवा सुट्टीचा आदेश प्राप्त झाला. रेल्वेने सोलापूर गाठले आणि इथून पूढे उस्मानाबाद येथील गावाकडे घरी गेल्यावर आईनेदेखील ओळखले नव्हते, कारण बर्फाळ क्षेत्रात राहून माझ्या शरीरात खूप बदल झाले होते. माझं चेहरा पूर्ण सुजलेला होता. आईने दार उघडताच काही मिनिटे ओळखले नव्हते.
हेही वाचा - नारायण राणे पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती- गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका