सोलापूर - येथील सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील 5 वर्षाच्या चिमुरडीवर 55 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून नराधमाने शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पोलीस आपोरीच्या मागावर आहेत.
सोमवारी 11 ऑगस्टला, घरा शेजारच्या 5 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवले. यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच आईने तिचा शोध सुरु केला, यावेळी घरालगतच्या बाजरीच्या पिकातून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलीस उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. तरी लवकरात लवकर आरोपीला पकडून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.