सोलापूर - सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस सोलापूर शहर आणि जिल्ह्याची अवस्था बिकट होत चालली आहे. अनेक सण आणि धार्मिक कार्यक्रमांवर कोरोना महामारीचे सावट निर्माण झाले आहे. आज (बुधवारी) रामनवमी निमित्त सोलापुरातील दाजी पेठ येथील राम मंदिरात अत्यंत साधेपणाने मंदिर समितीच्या विश्वस्तांनी रामनवमी साजरी केली. राम मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यंदाच्या राम नवमीला कोणत्याही भाविकाला मंदिरात प्रवेश मिळाला नाही.
शहरातील पूर्व भागात असलेल्या दाजी पेठ येथे प्रसिद्ध असे प्रभू श्रीराम यांचे मोठे मंदिर आहे. दरवर्षी रामनवमीला येथे हजारो भाविक दाखल होतात. अभिषेक आणि जन्मोत्सव कार्यक्रमासाठी सोलापुरातील विविध तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. पण यंदा कोरोना महामारीने देवाचे दारे देखील बंद केली आहेत.
अत्यंत साधेपणाने अभिषेक सोहळा आणि जन्मोत्सव
दाजी पेठ येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीस अत्यंत साधेपणाने अभिषेक सोहळा केला असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली. जन्मोत्सव कार्यक्रम सोहळा देखील मोजक्याक पुरोहितांच्या व मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.