सोलापूर - प्रहार संघटनेच्या वतीने सोलापुरात शेकडो किलो बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले आहे. (bundi distributed in solapur). देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन झाल्याने अपंग संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करत आहेत. (independent Ministry of Disability). सोलापुरातही प्रहार अपंग संघटनेच्या वतीने बुंदी लाडूचे वाटप करून अपंगानी जल्लोष साजरा केला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून दिव्यांग बांधवांची होणारी परवड आता थांबेल असा विश्वास प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी (Prahar Organization) यावेळी व्यक्त केला आहे.
प्रहारमुळेच महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालयाची स्थापना- देशातील हजारो दिव्यांग बांधव हे शासनाच्या वेगवेगळ्या मंत्रालयाकडे अनेक मागण्या करत होते. महाराष्ट्र राज्यातील अपंगांसाठी प्रहार अपंग सामाजिक संघटना ही कार्य करत आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बचू कडू हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या दिव्यांग मंत्रालयाची स्थापना व्हावी अशी मागणी करत होते. आता राज्य सरकारने ही मागणी मान्य करत दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली आहे.
शेकडो किलो बुंदी लाडू वाटप करून जल्लोष - सोलापुरातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंग बांधवासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. यावेळी बुंदीच्या लाडूंचे वाटप करून अपंग बांधवांचे तोंड गोड केले गेले. यावेळी प्रहारचे जमीर शेख यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होण्यामागे आमदार बच्चू कडू यांची प्रमुख भूमिका आहे. या मंत्रालयामुळे आता दिव्यांगांना न्याय मिळणार आहे.