सोलापूर - उजनी आणि वीर धरणातून आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरची चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून नदी काठावर पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच नागरिकांना नदीपात्राकडे जाण्यापासून रोखण्यात येत आहे.
पंढरपूरला जोडणाऱ्या नव्या पुलावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शिवाय अनेकजण सेल्फी किंवा शुटिंग घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पाणी पुलापर्यंत पोहचल्याने कोणतीही जीवितहानी होऊ नये, म्हणून पोलीस नागरिकांना पुलावर थांबण्यास तसेच सेल्फी घेण्यास मज्जाव करत आहेत.
शहर आणि शेजारील गावातील नागरिक सध्या नदीपात्राकडे जाताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.