पंढरपूर - माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर येथील 13 ऊसतोड मजूर कामगारांची सुटका करण्यात आली. अकलूज पोलिसांच्या माध्यमातून 21 डिसेंबर रोजी कामगारांची सुटका करण्यात आली. वाफेगाव येथे आर्थिक कारणावरून या मजुरांना गावाकडे जाण्यास शेतकऱ्यांनी मनाई केली होती. मध्यप्रदेश प्रशासनातील पथकासह अकलूज पोलिसांनी मध्यस्थी करून सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्थिक कारणावरून केली होती मनाई...
मध्यप्रदेश येथील मजूर माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे ऊस तोडणीच्या कामासाठी पंधरा दिवसापूर्वी आले होते. यासाठी वाफेगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांना थोडा पैशाचा मोबदला दिला होता. त्यामुळे हे मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी हजर झाले. मात्र त्यातील काही मजूर काम न करता गावी निघून गेले. तसेच उर्वरित कामगारही काम न करता गावी निघून चालले होते. दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तेरा मजूर कामगारांना गावी जाण्यास मनाई केली, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
मध्यप्रदेश प्रशासनाकडे मदतीची मागणी...
ऊसतोड कामगारांनी निघून गेलेल्या मजूर कामगारांना फोनद्वारे सदर प्रकरणाची माहिती दिली. त्या मजुरांनी स्थानिक प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सदर प्रशासनाने एक पथकाची नेमणूक केली. यासाठी स्थानिक न्यायालयाकडून आदेश देण्यात आला होता. सदर पथकाने अकलुज पोलिसांच्या मदतीने वाफेगाव येथील 13 मजुरांची सुटका केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे.